जालना - वीजदरवाढी संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रम पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये मंठा शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलाने मारहाण करून जाळण्यात आले.
आघाडी सरकारवर कडाडून टीका
भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी वीजदरवाढ संदर्भात आघाडी सरकारवर आणि विशेष करून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर कडाडून टीका केली. पाटील यांनी, हे सरकार म्हणजे तीन तोंडाचे माकड आहे, असे म्हणत ऊर्जा मंत्र्यांना गाढव म्हणण्यापर्यंत मजल गाठली. आंदोलनादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांच्या हातामध्ये नितीन राऊत यांच्याविरोधात विविध घोषवाक्य असलेले फलक पाहायला मिळाले.
राहुल लोणीकर यांनी प्रास्ताविकेमध्ये, कोणीही वीजबिल भरू नये, असे आवाहन केले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष विक्रम पाटील यांनी, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कशाप्रकारे वीजबिल वाढवून जनतेची फसवणूक केली, हे सांगण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - बदनापूर पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारतीची मागणी