जालना - तब्बल एक वर्षांपूर्वी म्हणजेच 22 मार्च 2020 रोजी जालना जिल्ह्यामध्ये लॉकडाउनला सुरुवात झाली होती. आजही जिल्ह्यामध्ये त्यावेळीपेक्षा जास्त भयानक परिस्थिती आहे. कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या लॅबसमोर संशयित रुग्णांना कोरोनाच्या अहवालासाठी उन्हात प्रतीक्षा करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे कोरोना वाढत आहे की काय? असाही प्रश्न आता भेडसावत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कोविड-१९ पॅथॉलॉजी लॅब आहे. या लॅबमधून तपासणी केलेल्या रुग्णांचे अहवालच दोन दिवसांनंतरही मिळत नाहीत. जोपर्यंत हे अहवाल येत नाहीत, तोपर्यंत रुग्णाने काय करायचे ? हादेखील एक प्रश्नच आहे.
हेही वाचा-बारामती; आस्थापना, दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार
कोरोना चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी लागतो उशीर-
अँटीजन टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आल्यानंतर रुग्ण खासगी रुग्णालयात भरती होतो. मात्र, तिथेदेखील त्याची पिळवणूक होते. या रुग्णालयाकडून रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मागितला जातो. अन्यथा पुन्हा एकदा त्याची आरटी पीसीआर चाचणी केली जाते. त्यामुळे नाहक पुन्हा तीन ते चार हजार रुपयांचा दंड या कोरोनाबाधित रुग्णाला भरावा लागत आहे. याहीपेक्षा मोठा कहर म्हणजे रुग्णांना अहवाल मिळण्यासाठी लागणारा उशीर आहे. कोरोनाची लागण झाली म्हटले की रुग्ण अर्धा खचून जात आहे. अशा परिस्थितीत त्याला दिलासा देऊन पुन्हा खंबीरपणे उभे करणे तर सोडाच मात्र कोविड रुग्णांनाच या लॅबसमोर चार तासांहून अधिक वेळ उन्हामध्ये उभे राहावे लागत आहे.
हेही वाचा-मुंबई : महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली, मुंबईतील अनेक चित्रपटगृहात अँटिजेन टेस्टच होत नाहीत
आजारी असलेल्या महिलेची अहवालासाठी तीन तास उन्हात प्रतिक्षा-
कोरोनाबाधित महिला दुपारी एक वाजल्यापासून लॅब समोर अहवाल घेण्यासाठी बसली होती. ती स्वतःहून मी पॉझिटिव्ह असल्याचे सांगत होती. तरी देखील तिच्या अहवालाकडे व तिच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी या महिलेला एके ठिकाणी बसणे अशक्य झाल्याने ती बाजूला जाऊन बसली. बोलण्याच्या मनस्थितीत नसलेल्या या महिलेने काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र, लॅबसमोर गेल्या तीन तासापासून बसल्याचे तिने सांगितले आहे. येथील परिस्थितीचे चित्रीकरण होत असल्याचे लॅबमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हालचाल सुरू केली. त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या अन्य गरजुंनीदेखील या महिलेची स्थिती पाहिल्यानंतर अगोदर तिचा अहवाल देण्यासाठी लॅबमधील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तिथून पुढे सूत्रे हलली. विशेष म्हणजे याच ठिकाणी अन्य कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईकदेखील अहवाल घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे जे निगेटिव्ह व्यक्तीदेखील पॉझिटिव्ह होण्याचा होण्याची शक्यता वाढली आहे.
हेही वाचा-मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक, काल दिवसभरात 30 जणांचा मृत्यू
धक्कादायक आकडेवारी-
कोरोनाबाधित रुग्णांची गेल्या तीन महिन्यातील आकडेवारी धक्कादायक आहे. जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात केवळ 581 कोरोनाबाधित रुग्ण होते. तर फेब्रुवारीमध्ये 1,817 झाले आहेत. तर मार्च महिन्यात २१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण 6, 144 एवढे वाढले आहे. झपाट्याने वाढणारी ही आकडेवारी जालनेकरांसाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येकाने मास्क वापरला तर निश्चितच कोरोनाला आळा बसू शकेल, अशी भावना सूज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.
रविवारच्या (२१ मार्च) आकडेवारीनुसार अशी आहे राज्यातील कोरोनाची परिस्थिती
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 30 हजार 535 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 24 लाख 79 हजार 682 वर पोहोचला आहे. 24 तासांमध्ये 11 हजार 314 जणांनी कोरोनावर मात केल्याने, राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या 22 लाख 14 हजार 867 वर पोहोचली आहे. तर राज्यात सध्या परिस्थितीमध्ये 2 लाख 10 हजार 120 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.15 टक्के एवढे आहे.