जालना - राज्यस्तरीय 'दुःखी' पुरस्कार प्रसिध्द कवी आणि कथाकार किशोर कदम (सौमित्र) यांना प्रदान करण्यात आला. उर्दू शायर गीतकार राय हरिश्चंद्र सहानी 'दुःखी' यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
स्वर्गीय नंदकिशोर सहानी चारीटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे हे विसावे वर्ष आहे. पुरस्कार वितरण समारंभाच्या वेळी व्यासपीठावर नंदकिशोर सहानी चारीटेबल ट्रस्टचे अभय सहानी, विनीत सहानी, अनुभव प्रतिष्ठानच्या संजीवनी तडेगावकर यांच्यासह पत्रकार विजय चोरमारे, शोभा रोकडे, आबा पाटील, बालाजी सुतार, भरत दौंडकर, यांची उपस्थिती होती. या पुरस्कार वितरण समारंभानंतर व्यासपीठावरील कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचाही सत्कार करण्यात आला. प्राध्यापक विलास भुतेकर, ज्ञानेश्वर गिराम, कालिदास वेदपाठक या छायाचित्रकारांचा तर चित्रकार संजीवनी डहाळेंचा सत्कारार्थीं मध्ये समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले. दरम्यान या कार्यक्रमाला शहरातील व्यापारी, साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.