जालना - स्थानिक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावे, त्यासाठी लागणारे पोषक वातावरण त्याला मिळावे, या हेतूने जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात असलेल्या अवघ्या पंधरा हजार लोकसंख्येच्या तीर्थपुरी या गावात 12 एकरवर भव्यदिव्य क्रीडासंकुल उभे राहत आहे. सुमारे दहा हजार प्रेक्षक बसतील एवढी क्षमता या क्रीडासंकुलाची आहे. तसेच पोलीस भरती, सैन्य भरती यासारख्या भरतीसाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण, अंगमेहनत आणि मैदानी खेळ यासाठी हे क्रीडासंकुल पूर्णत्वाकडे जात आहे. जालना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून तरुण पीढीसाठीच नव्हे, तर आबालवृद्धांच्या शरीर संपत्तीला सुदृढ ठेवण्यासाठी याची उभारणी होत आहे.
जालन्यापासून 60 किलोमीटर तर बीडपासून 80 किलोमीटर अंतरावर तीर्थपुरी या गावाच्या पूर्व दिशेला हे क्रीडासंकुल आहे. ग्रामपंचायतीच्या 36 एकर जागेपैकी बारा एकर जागेमध्ये याची उभारणी सुरू आहे. त्यामध्ये क्रिकेट या महत्त्वाच्या आणि लोकप्रिय खेळासोबतच कुस्ती, कबड्डी, ओपन जिम अशा प्रकारच्या विविध खेळांसाठी ही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे 36 एकर गायरान जमिनीपैकी बारा एकर क्रीडासंकुलासाठी, पाच एकर सौरऊर्जा प्रकल्पासाठी, पाच एकर जमीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी, तीन एकर जमीन पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी आणि उर्वरित जमीन शासनाच्या नियमाप्रमाणे गायनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
रात्रंदिवस खेळता येतील सामने -
राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूदेखील इथे येऊन सामना खेळू शकतील. त्यानुसार क्रीडासंकुलाचे नियोजन करण्यात आले आहे. रात्रीच्यावेळी प्रकाश झोत चांगल्या पद्धतीने मिळावा यासाठी सहा फ्लडलाइट लावण्यात आले आहेत. एका खांबावर 28 हजार वॅटचा प्रकाशझोत आहे. या मैदानावर रात्रीदेखील प्रकाश राहणार आहे.
या क्रीडासंकुलाचे वैशिष्ट-
धावपटूंसाठी आणि प्रभातफेरी करणाऱ्या आबाल वृद्धांसाठी क्रीडासंकुलाच्या मैदानावर चार मीटर रुंद आणि 600 मीटर लांबीची काँक्रीटची धावपट्टी, तर सात मीटर रुंद आणि 700 मीटर लांबीची मातीची धावपट्टी तयार करण्यात आली आहे. परिसरात एक हजार वृक्षारोपण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आवश्यक असणाऱ्या क्रीडा मैदानाप्रमाणेच संकुलाच्या मध्यभागापासून 78 मीटरचे परिक्षेत्र आहे.
महेंद्र पवार यांचा पुढाकार
15 ते 17 हजार लोकवस्ती असलेल्या तीर्थपुरी ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच अशी दहावर्षे पद उपभोगल्यानंतर सध्या जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून महेंद्र पवार हे कार्यरत आहेत. सरपंच म्हणून त्यांचे धाकटे बंधू शैलेंद्र पवार हे कार्यरत आहेत. गावांमध्ये विकास करण्यासोबतच विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे, याकरिता यशवंत सेवाभावी संस्थेच्यावतीने इंग्रजी माध्यमाची शाळाही त्यांनी सुरू केली आहे. त्यांच्याच प्रयत्नातून तीर्थपुरी ग्रामपंचायतला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कारवाई पूर्ण करण्यात आली असून पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये तीर्थपुरी ग्रामपंचायतला नगरपंचायतीचा दर्जा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- सरकारचे नेमके चाललंय काय? ते लोकांनाही कळू द्या- खा. संभाजीराजे