जालना - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
जालना पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर -
सुख-दुःखामध्ये गुरुंची आठवण काढा म्हणजे शक्ती आणि शांती मिळेल. एवढेच नव्हे तर जिथे जिथे सकारात्मक ऊर्जा मिळेल तिथे तिथे हे गुरुच आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत असे समजा, अशी भावना उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे पोलीस अधिकारी खिरडकर यांनी तब्बल 14 वर्षे शिक्षक म्हणून कार्य केले आहे.
ते मूळ विदर्भातील आहेत. यामुळे त्यांचे नाते संत गजानन महाराज यांच्याशी जोडले गेले आहे. याच भावनेतूनच ते गजानन महाराजांना गुरु ठिकाणी मानतात. ते म्हणाले, आयुष्यातले पहिले गुरू आई -वडील, त्यानंतर शालेय शिक्षणात शिक्षक आणि त्यापुढे जिथे जिथे सकारात्मक ऊर्जा मिळेल त्या त्या ठिकाणी गुरु आहेत असे मी मानतो. आयुष्यात सुखदुःखाच्या वेळी गुरुंची आठवण काढली पाहिजे. त्यामुळे शक्ती आणि शांती मिळते.
14 वर्षे शिक्षकी व्यवसाय करत असताना पाच सप्टेंबर हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणजेच गुरू-शिष्याच्या नात्याला उजाळा देणारा दिवस म्हणून साजरा केला जात होता. त्यावेळी विद्यार्थ्यांचा शिक्षकाप्रती असलेला आदर पाहून मन भरुन येत होते. आजही ते दिवस आठवले की मन भरून येते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे असे उत्सव तो आनंद घेता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या घरातच गुरु सेवा करावी. घरात बसण्यासाठी गुरुंनीच आदेश दिला आहे, असे समजून आपल्या कामातच गुरु पहावा आणि ते काम करत राहावे, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.