जालना - जिल्हा शिवसेनेच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात गरजूंना आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना भाजीपाल्याच्या दहा हजार किटचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यावतीने करण्यात येणाऱ्या या वाटपाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज केला.
लॉकडाऊनच्या काळात बाजारामध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून 10 हजार गरजूंना भाजीपाला किटच्या वाटपाचा निश्चय केला आहे. एका थैली मध्ये शेवग्याच्या शेंगा, पत्ताकोबी, टोमॅटो ,कारले, आणि शिमला मिरची अशा पाच प्रकारच्या पाच दिवस पुरतील एवढ्या भाज्या देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे पाच दिवस या भाज्या टिकू शकतात. त्या पद्धतीने त्यांची निवड केली आहे.
आज हा भाजीपाला आपत्ती व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनातील कर्मचाऱ्यांना वाटप होणार आहे. या विभागांच्या विभाग प्रमुखांकडे त्यांच्या मागणीनुसार हा भाजीपाला पुरवठा केला जाईल. आणि नंतर तो विभाग प्रमुखांच्या माध्यमातून वितरित होणार आहे. तसेच गावांमध्ये नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागातील गरजूंना देखील हा भाजीपाला मिळणार आहे. आज या भाजी वाटपाच्या शुभारंभप्रसंगी माजी मंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह जिल्हाप्रमुख भास्क आंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, विष्णू पाचफुले ,दिपक रणनवरे ,बाला परदेशी, पंडीतराव भुतेकर, आदींची उपस्थिती होती.