जालना - कोरोना पसरू नये, म्हणून पूर्ण राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना मजूर, स्थलांतरित मजूर व हातावर पोट असणाऱ्यांचा जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी बदनापूर तालुक्यातही 3 एप्रिलपासून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. दुपारी 12 ते 2पर्यंत या ठिकाणी पाच रुपयांत जेवण उपलब्ध राहणार आहे. इतकेच नाही तर बदनापूर येथे सद्यस्थितीचा विचार करून शिवभोजन कक्ष चालकाने पाच रुपयेसुद्धा न घेता विनामूल्य थाळी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या कोरोनाचे थैमान महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यामुळे हातावर काम करणाऱ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झालेला हेाता. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिवभोजन योजनेंतर्गत 10 रुपयांची थाळी 5 रुपयाला करण्यात आली होती. महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संकल्पनेतून शिवभोजन थाळी सुरू केली.
जिल्ह्यासह अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पंधरवड्यापासून कोरोना रोग पसरू नये, म्हणून लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे बदनापूर तालुक्यातील हातावर काम करणाऱ्यांची उपासमार होऊ नये, म्हणून शासनाच्यावतीने येथील योगेश रघुनाथ खैरे यांना दिनांक 3 एप्रिलपासून शिवभोजन थाळी सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे. खैर यांनी कालपासून तत्काळ येथील संत सावता महाराज मंदिराजवळ शिवभोजन थाळी सुरू केली आहे.
5 रुपये नव्हे तर मोफत थाळी -
'आम्हाला शिवभोजन थाळी सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही तत्काळ ही योजना बदनापूरकरांसाठी सुरू केली आहे. सध्याचे दिवस बघता शासनाने ठरवून दिलेले पाच रुपयेही आम्ही घेत नसून या ठिकाणी आम्ही जेवणासाठी टेबल खुर्च्याची व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत असून ज्यांना येथे येणे शक्य नाही त्यांच्यासाठी पार्सल सुविधाही करण्यात आलेली असून सध्या तरी आम्ही हे सर्व विनामूल्य देत असल्याचे योगेश खैरे यांनी सांगितले.