जालना - भोकरदन तालुक्यातील राजूर येथे लिंगायत समाजास 2011 पासून स्मशानभूमी नाही. यामुळे समाजबांधवांनी टोकाचे पाऊल उचलून ग्रामपंचायत कार्यालय आवारात महिलेचा दफन विधी केला.
शनिवारी सकाळी आठ वाजता मयत महिलेच्या मृत्यूची ग्रामपंचायतला माहिती देऊनही अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने समाजबांधवानी त्या महिलेचा मृतदेह राजुर ग्रामपंचायतमध्ये आणला. ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, यांना धारेवर धरून स्मशानभूमी नसल्यामुळे मृतदेह दफन विधी राजुर ग्रामपंचायत कार्यालयात केला. पोलिसांनी तो मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी बाहेर काढला असून, शिवा संघटना व नातेवाईकांवर जमाव बंदी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी भोकरदन न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणी अजून न्यायालयाचे आदेश येणे बाकी आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके सह पोलिस कर्मचारी दाखल झाले होते.