जालना - जिल्ह्यातील अनेक गावांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टँकर असतानाही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेने सुरू केलेल्या 'मुकाबला दुष्काळाचा' या योजनेमुळे अनेक गावांना फायदा झाला आहे. त्यातीलच एक गाव म्हणजे दहिफळ (काळे) या गावांमध्ये घेतलेल्या बोरमुळे गावातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
काही सामाजिक कार्यकर्ते आणि दानशुरांच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी निधी जमविला. या निधीमधून गावच्या पाणी संकटावर मात करण्यासाठी बोअर घेतला. घेतलेल्या बोरला मोठ्या प्रमाणात पाणी लागले आहे. यामुळे गावचा पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे. या बोरमुळे दुष्काळाला आळा बसला आहे.
या योजनेचे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी पंडीतराव भुतेकर आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलपूजन झाल्यानंतर नामदार खोतकर आणि आंबेकर यांच्या हस्ते गावकऱ्यांना पाणी वाटपही करण्यात आले.