जालना - राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 मधील सेवकांच्या सहकारी पतसंस्थेत सुमारे सव्वा कोटींचा घोटाळा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या या पतसंस्थेला सील ठोकण्यात आले असून, याठिकाणी शस्त्रधारी जवानांचा खडा पहाराही ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. दरम्यान, सहायक निबंधक यांना पतसंस्थेचे ऑडिट करण्यासाठी सांगण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा किती मोठा घोटाळा आहे हे ऑडिट झाल्यानंतरच कळणार आहे.
दरम्यान, गेल्या 14 वर्षांपासून या पतसंस्थेच्या सचिव पदावर चिटकून बसलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक अवचार यांच्या काळात हा घोटाळा झाला आहे. 31 मे रोजी अवचार सेवानिवृत्त झाल्यामुळे या पतसंस्थेचा पदभार इतरांकडे सोपवताना हा घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या राज्य राखीव पोलीस बलाच्या जवानांसमोर पुन्हा एक आर्थिक संकट उभे राहिले आहे. या कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयावर प्रभारी लेखापाल व्ही. एम. कुलकर्णी, बिनतारी संदेश यंत्रणेचे पोलीस निरीक्षक आर. वी. काथार, पोलीस निरीक्षक वि.द. जगताप या तिघांची सही असलेले सील 12 जून रोजी लावण्यात आले आहे.
सुमारे हजार कर्मचारी राज्य राखीव पोलीस दलामध्ये आहेत .मात्र गेल्या अनेक वर्षांपासून खासगी कंपन्याही गृहकर्ज व इतर कर्ज देऊ लागल्यामुळे अनेकांनी बाहेरून कर्ज घेतले आहे. सध्या या पतसंस्थेमध्ये सुमारे 400 कर्मचाऱ्यांचे पैसे गुंतले आहेत. कर्मचाऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करणे, बचत करणे, आणि या माध्यमातून भांडवल जमा करणे हा या संस्थेचा उद्देश असतो. मात्र यात कर्मचाऱ्यांच्या भांडवलावर त्यांच्याच एका सहकाऱ्याने डल्ला मारल्याचे समोर आले आहे. राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक हे या पतसंस्थेचे अध्यक्ष आणि अन्य एक वरिष्ठ अधिकारी सचिव म्हणून काम पाहतात. समादेशक हे वारंवार बदलत राहतात. त्यामुळे ते फक्त रबरी शिक्के असतात. सध्या डॉ. अक्षय शिंदे हे समादेशक म्हणून आहेत, आणि तेदेखील नुकतेच आलेले आहेत. त्यामुळे त्यांना या घोटाळ्यातील फारशी काही माहिती नाही. खरतर समादेशक हे नावापुरतेच असतात. प्रत्यक्ष कारभार हे सचिव पाहतात. त्यामुळे गेल्या 14 वर्षांपासून या पतसंस्थेच्या सचिवपदी सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. ए .अवचार हे कार्यरत होते.
एकच माणूस 14 वर्ष कार्यरत असण्याची ही पहिलीच पतसंस्था आहे. अवचार हे सेवानिवृत्त झाल्यामुळे समोर आलेल्या या घोटाळ्याने पोलीस जवानांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. थोडक्यात काय तर 'दुष्काळात तेरावा महिना' असे म्हणता येईल.
या घोटाळ्यासंदर्भात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीनचे समादेशक डॉ. अक्षय शिंदे यांनीदेखील दुजोरा दिला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी चार सदस्य समिती नियुक्त केली आहे. या समितीमध्ये दोन पोलीस निरीक्षक, एक लिपिक, आणि एक रायटर यांचा समावेश आहे. या समितीच्या अहवालानुसार आणि सहायक निबंधकांनी ऑडिट केल्यानंतर आरोप सिद्ध झाल्यावर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तुर्तास अवचार यांचे सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारी सर्व शासकीय देयके थांबवण्यात आली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार या पतसंस्थेमध्ये ठेवी, रोख व्यवहार, मुदत ठेव, अशा विविध योजनांमधून सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.