जालना - एकूण रकमेपैकी चार टक्के रक्कम लाच स्वीकारणाऱ्या सरपंचाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आज (शुक्रवारी) औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. बेलाप्पा जनार्दनआप्पा पिसुळे (वय 58) असे या लाचखोर सरपंचाचे नाव आहे.
24 हजारांची मागितली लाच -
भोकरदन तालुक्यात धावडा गावातील बाजार शेडचे काम औरंगाबाद येथील एका कंपनीने घेतले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर या कामाच्या देयकापोटी सहा लाख 2 हजार रुपयांचा धनादेशही कंपनीला मिळाला. त्यानंतर धावड्याचे सरपंच बेलाप्पा जनार्दनआप्पा पिसुळे (वय 58) यांनी तक्रारदाराकडे सहा लाख दोन हजारांचे बिल काढल्यापोटी चार टक्के कमिशननुसार 24 हजार रुपयांची मागणी केली. तसेच या मागणीसाठी त्यांनी तक्रारदाराकडे तगादा लावला होता. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली.
हेही वाचा - २ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठीला रंगेहाथ अटक
या तक्रारीची शहानिशा करून विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी जालना येथे सापळा रचला. यानुसार पिसुळे हे अंबड चौफुलीहुन औरंगाबादकडे जात असताना तक्रारदाराने त्यांना 24 हजार रुपयांची लाच दिली. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिसुळे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आल्यामुळे याच पोलीस ठाण्यात बेलाप्पा पिसुलेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन दिवसांपूर्वी लाचखोर शिक्षणसंस्था चालकाला रंगेहाथ पकडले होते.