जालना - समोसा, कचोरी विकणाऱ्या व्यावसायिकाला मारहाण करून 60 हजार रुपये पळविल्याची घटना घडली आहे. शहरातील देहेडकरवाडी भागाला लागून असलेल्या शीशे टेकडी येथे गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला.
हेही वाचा- जळगावात भाजपला काँग्रेसचा 'हात', जिल्हा परिषदेत वर्चस्व कायम
गयाबाई शांतीलाल गोरे आणि त्यांचा परिवार ठोक भावात समोसे आणि कचोरी विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे घरातील चार सदस्यांसह काही नातेवाईक देखील त्यांना मदत करतात. मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेख समीर (वय 20) आणि त्याच्या दोन मित्रांनी येऊन गयाबाईच्या मुलाला आणि त्यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले. त्यांच्या पर्समधील साठ हजार रुपये लंपास केले.
सुदैवाने यावेळी समोसे तळण्याची भट्टी सुरू नव्हती. त्यामुळे दुर्घटना झाली नाही. मात्र, गयाबाईंना आणि त्यांच्या मुलाला यात मार लागला आहे. या दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यांच्या मुलाला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी गयाबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात घरात घुसून मारहाण करणे, छेडछाड करणे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.