जालना - लोकसभा मतदानाच्या वेळी सुरुवात झालेल्या सखी मतदान केंद्राची प्रथा विधानसभेच्या मतदानाच्या वेळीही दिसून आली. जालना विधानसभा मतदान केंद्रातील केंद्र क्रमांक 55, सेंट मेरी हायस्कूल येथे हे सखी मतदान केंद्र सुरू होते. या मतदान केंद्रांमध्ये केंद्राध्यक्षा पासून ते त्यांना सहकार्य करणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांपर्यंत सर्व कर्मचारी या महिलाच होत्या.
विशेष म्हणजे एखाद्या समारंभाप्रसंगी ज्याप्रमाणे आपण सुशोभीकरण करतो अशा पद्धतीने या केंद्राचे सुशोभीकरण करण्यात आले. प्रवेशद्वारावरच कृत्रिम फुलांची माळ, मतदान केंद्राच्या कक्षा भोवती फुलांची सजावट, एवढेच नव्हे तर आलेल्या मतदारांचा उत्साह वाढावा म्हणून प्रवेशद्वारावरच वेलकम करणाऱ्या गाईडच्या विद्यार्थिनी देखील प्रवेशद्वारावर होत्या.
हेही वाचा - तृतीयपंथीयांनाही सन्मान मिळावा - सोनाली शेख
शंभर टक्के महिलांनी महिलांसाठी चालविलेले हे सखी केंद्र. महिलांना रांगेत उभे करण्यासाठी देखील महिला पोलीसच येथे तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे हे मतदान केंद्र सुरू होते. मतदानासाठी आलेल्या महिलांना या मतदान अधिकाऱ्यांकडून प्रेरणा मिळावी आणि महिलादेखील एखादं काम हाती घेतले तर त्या सक्षम पणे पूर्ण करू शकतात हेच या मतदान केंद्रातून दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. केंद्राध्यक्ष डॉ. प्रतिभा श्रीपत यांच्यासह त्यांना मदत करण्यासाठी मतदान केंद्र अधिकारी म्हणून सुनिता भोसले, गीता पोरवाल, वंदना शिंदे, रोजमेळी खंडागळे, संगीता चव्हाण या महिला अधिकारीही येथे होत्या.
हेही वाचा - बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन गटात हाणामारी