जालना - हैदराबाद राजवटीतून 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा मुक्त झाला. त्या दिवसाची आठवण म्हणून मराठवाड्यामध्ये 17 सप्टेंबर हा दिवस 'मराठवाडा मुक्ती दिन' म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. दरवर्षी मुक्तीसंग्राम दिनाच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले जाते आणि बंदुकीच्या फैरी झाडून सलामीही दिले जाते. यावर्षी देखील उद्या सकाळी नऊ वाजता जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते येथे ध्वजारोहण होणार आहे. त्याची आज रंगीत तालीम घेण्यात आली.
उद्या सकाळी नऊ वाजता प्रमुख पाहुण्यांचे आगमन, हुतात्म्यांना श्रद्धांजली, स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण, हवेत गोळीबारकरून मानवंदना आणि ध्वजारोहण असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाची रंगीत तालीम उपविभागीय अधिकारी सानप यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. सानप आणि तहसीलदार श्रीकांत भुजबळ या दोघांचीही जालन्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्यांनी आज सकाळपासूनच या स्मृती स्तंभाजवळ रंगीत तालीम घेऊन अन्य तयारीची पाहणी केली. त्यांच्यासोबत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी नितीन नार्वेकर देखील उपस्थित होते.