जालना - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज शासकीय अधिकाऱ्यांसह व्यापारी आणि जिनिंग चालकांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून नोंदणी पद्धतीने कापूस खरेदी आणि मोसंबी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या मोसंबीचे मोठ्या प्रमाणात पीक आले आहे. मात्र, वाहतुकीची अडचण आणि ग्राहकांची मागणी नसल्यामुळे व्यापारी हा माल कमीत कमी खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या घरांमध्ये अजूनही पंचवीस ते तीस टक्के कापूस पडून आहे. मात्र, सामाजिक अंतर आणि त्याचे उल्लंघन झाल्यानंतर होणारी कारवाई यामुळे जिनिंगमालक कापूस उतरून घेण्यास तयार नाहीत. या दोन्ही अडचणींवर आज या बैठकीत तोडगा काढण्यात आला. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या मालाची नोंदणी त्यांच्या हद्दीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे करावी आणि त्यानुसार संबंधित शेतकऱ्याला ज्यावेळी माल घेऊन येण्याचा निरोप जाईल, त्याच वेळी त्याने तो बाजार समितीत विक्रीसाठी आणावा अन्यथा पूर्व नोंदणी न करता आणलेला माल घेतला जाणार नसल्याचेही सभापती खोतकर यांनी सांगितले.
दरम्यान, ट्रकमधून कापूस उतरविताना सामाजिक अंतर पाळले जाऊ शकत नाही, कारण एक ट्रक रिकामा करण्यासाठी दहा ते पंधरा मजूर लागतात आणि ट्रकचा आकार पाहिल्यास या सामाजिक अंतराचा नियम पाळणे शक्य नाही. या नियमाचा भंग झाल्यास संबंधित जिनिंग चालकाला कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी भीतीही ही जिनिंग चालकांनी व्यक्त केली. त्यामुळे शेतकर्यांनी कापूस नोंदणी केल्यानंतर याविषयीचे मार्गदर्शन जिल्हाधिकाऱ्यांकडून घेऊन खरेदी करता येईल, अशी माहितीही जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली.
आज झालेल्या या बैठकीला सहायक निबंधक परमेश्वर वरखडे, शरद तनपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे, जिनिंग चालक नितीन जेथलिया, शरद कुमार गुप्ता, सिताराम भोसले, संजय छल्लाणी, दिनेश रुणवाल, रमेश मुंदडा, रमेश सोनी, अनिल सोनी, गोपाल काबलिये, मोहन राठोड, अनिल खांडेभराड आदींची उपस्थिती होती.