जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये हे सरकारचे प्रयत्न अपुरे पडत आहेत आणि या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांचा सरकार आकडा लपवत आहे. तसेच राम मंदिराचे ई-भूमिपूजन करणार म्हणणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः पंढरपुरला का गेले, त्यांनीदेखील ई-उद्घाटन करायचे असते. त्यामुळे आता दुसऱ्याला सांगण्याचा त्यांना अधिकार नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला.
जालना जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आत्तापर्यंत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन एकही बैठक बोलावली नाही. याबद्दल खासदार दानवे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्यानंतर आज जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडली. त्यानंतर खासदार दानवे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दानवे यांनी मात्र राज्य सरकारचा समाचार घेतला, कोरोनाला रोखण्यामध्ये या राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडत आहेत, असे ते म्हणाले.
जालना शहरात या आजाराला आळा घालण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले आहे. शहरात नवीनच उभारणी केलेल्या कोरोनाच्या प्रयोगशाळेत रोज १ हजार चाचण्या घेण्याची क्षमता असताना केवळ १०० ते १५० चाचण्या होत आहेत. म्हणजे हा संशयित रुग्ण लपविण्याचा प्रकार आहे. त्याचसोबत आपल्याकडे प्रयोगशाळा असताना बाहेरगावी हे नमुने तपासणीसाठी का पाठवायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एखादा रुग्ण 18 तारखेला संशयित म्हणून रुग्णालयात भरती होतो, त्याचा 21 तारखेला लाळेचे नमुना घेतला जातो, आणि 26 तारखेपर्यंत त्याला अहवाल दिला जात नाही. तोपर्यंत हा संशयित रुग्ण गावभर फिरून आजार पसरवून येतो. या सर्व बाबीला राज्य सरकारच जबाबदार आहे, असा आरोपही खासदार दानवे यांनी केला.
दरम्यान, या प्रकाराला आळा घालण्यासाठी आपण शहराचे चार भाग करा, जबाबदार अधिकारी नेमा, तसेच दूध, भाजीपाला विकणाऱ्यांचे स्वॅब टेस्ट करा अशा सूचनाही त्यांनी दिल्याचे सांगितले. दरम्यान राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना दानवे म्हणाले, सध्या सरकारचे नियंत्रण कोणाच्या हातात आहे हे सांगायचे झाले तर दोन ड्रायव्हर आणि एक गाडी असे आहे. कधी हे चालवितात तर कधी ते चालवितात मुख्य सीटवर बसण्यासाठी कोणी तयारच नाही.
त्यासोबत राम जन्मभूमीच्या भूमिपूजन संदर्भात बोलतानाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले पंढरीच्या उद्घाटनासाठी, पूजेसाठी मुख्यमंत्री स्वतः जातात आणि कोरोना नष्ट होऊ दे असं म्हणतात. त्यामुळे आयोध्या राम जन्मभूमी उद्घाटनासाठी जाणाऱ्या पंतप्रधानांना ई उद्घाटन करा असे म्हणण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. त्यांनी जर स्वतः ई-उद्घाटन केले असते ते तर त्यांना तो अधिकार मिळाला असता असे खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.