जालना - कोरडवाहू क्षेत्रांमध्ये ऊस संशोधन केंद्राची गरजच काय? असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. जालना जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीनिमित्त ते जालन्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत रविकांत तुपकर, पूजा मोरे, साईनाथ चीन्नदोरे, पूजा मोरे, भगवान बंगाळे, सुरेश काळे यांची उपस्थिती होती.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ने जालना जिल्ह्यात ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या संस्थेला हा प्रकल्प मिळाला आहे. या ऊस संशोधन केंद्रासाठी आवश्यक असणारा ऊस पाणी नसल्यामुळे मराठवाड्यात उपलब्ध होत नाही. या इन्स्टिट्यूटला प्रत्येक साखर कारखान्यातून प्रत्येक पोत्यामागे एक रुपया दिला जातो. त्यामुळे हा शेतकऱ्यांचा पैसा आहे. मात्र, या पैशातून या ऊस संशोधन केंद्राकडून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील, असे वाटत नाही. त्यामुळे हे ऊस संशोधन केंद्र मराठवाड्यात काही उपयोगाचे नाही, असे मतही राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. त्यासोबत मागील सरकारप्रमाणेच या सरकारनेदेखील शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले आहे. तरी देखील या सरकारला थोडा वेळ द्यायला हवा असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या विविध संघटना आहेत. त्या एकत्र आणण्यासाठी देखील प्रयत्न केला होता. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आता ज्या संघटना आहेत त्यांनी आपापल्या परीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असेही ते म्हणाले.