जालना- कठपुतळी ही बोटांच्या तालावर बाहुल्यांना नाचण्याची कला आहे. गेल्या वीस वर्षांपूर्वी अशा कला ग्रामीण भागात जत्रेमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होत्या. प्रेक्षक वर्ग या कलेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत होता. मात्र, डिजिटलचा जमाना आला आणि कलाकुसरीचा जमाना गेला. त्यामुळे आता अशा कठपुतळ्या पाहायला मिळणे दुरापास्त झाले आहे. परंतु, ही कला जोपासून परत जनतेला या कलेकडे आकर्षित करण्यासाठी नागपूर येथील भट्ट बांधव जालण्यात आले आहेत.
हेही वाचा-जालन्यात आठ दिवसांपासून रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी
भारत भट हा परिवार कठपुतळ्यांचा खेळ करण्याचा व्यवसाय करतात. हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मनोरंजन करण्याचे काम ते करतात. जालन्यातील मस्तगड परिसरात असलेल्या परशुराम गणेश मंडळानेही ही कला जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नागपूर येथून आलेले भट्ट बांधव संध्याकाळी गणेश मंडळासमोर कठपुतळ्या नाचवण्याचा कार्यक्रम करतात. या नाचणाऱ्या बाहुल्या पाहून प्रेक्षक तर समाधानी होतातच मात्र, लहान मुलांच्या चेहऱ्यावर देखील आनंदाचे भाव उमटताना दिसतात.