जालना - भोकरदन तालुक्यातील खडकी हसनाबाद या दोन किलोमीटर रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. आज एका महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी बाजेवर बसवून खराब रस्त्यावरून चिखलातून वाट काढत दोन किलोमीटरचे अंतर जावे लागले. या रस्त्याची दुरुस्ती करावी म्हणून नागरिकांनी कित्येक वेळा निवेनाद्वारे शासनाकडे मागणी केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वंदना किशोर पवार या महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी नागरिकांनी गाडी बोलावली. मात्र, रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे गाडी दोन किलोमीटर अलीकडेच थांबावावी लागली. गावातील नागरिकांनी या महिलेला बाजेवरून दोन किलोमीटरवर आणून गाडीमध्ये बसवले. यानंतर तिला हसनाबाद येथील रुग्णालयात नेण्यात आले. अशाच पद्धतीने नागरिकांना, रुग्णांना अनेक वेळा समस्यांचा सामना करावा लागत असल्याने ते हैराण झाले आहेत. यामुळे संबधित अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
हेही वाचा - अंजूमनच्या 'या' ग्रंथालयात आहे, उर्दूतील सर्वात दुर्मिळ 'वाल्मिकी रामायण'