जालना - भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील पूर्णा नदीपात्रामध्ये अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा मारला होता. या छाप्यात एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर सोमवारी रात्री पकडले. मात्र ही वाहने पोलीस भोकरदनकडे घेवून येत असताना वाळू तस्करांनी जीप आडवी लावून वाहने नेण्यास विरोध केला. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रमेश मुरकुटे, प्रवीण जाधव, शिवाजी जाधव, संदीप जाधव, बाबासाहेब वराडे (सर्व रा. केदारखेडा), गजानन सहाणे, ( रा. वालसा डावरगाव ), लक्ष्मण बरडे (रा. फत्तेपूर), संजय रोडगे (रा. लिंगेवाडी) यांच्याविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप तस्करांनी केला आहे. याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करवा, अशी मागणीही वाळू माफियांनी केली आहे.