जालना - न्यायालयीन प्रकरणात मदत करण्यासाठी लाचेचा पहिला हप्ता घेणारा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना बुधवारी अंबड येथे घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदाराचा भाऊ, वहिनी आणि मुलगी यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांना न्यायालयात दाखल करताना मदत करावी यासाठी तक्रार दाराने याप्रकरणातील अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार जॉन पांडियन पिल्ले यांना विनंती केली. यावेळी जॉन पिल्ले यांनी 40 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने या विभागाने दिनांक 11 एप्रिलला पंचासमक्ष वीस हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी १३ मे रोजी सापळा लावण्यात आला. त्यावेळी लाचेचा पहिला हप्ता सात हजार रुपये घेताना जॉन पिल्ले यांना अंबड येथील प्रिन्स लॉजजवळ रंगेहात पकडले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.