जालना - घनसावंगी तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पानेवाडी शाखेत शुक्रवारी चोरट्यांनी डल्ला मारला. शनिवार, रविवार अशी दोन दिवस सुट्टी असल्यामुळे कोणाच्या लक्षात हा प्रकार येणार नाही, या उद्देशाने चोरी करून तिजोरीच पळविली. ही तिजोरी जालन्यात आणली आणि त्यानंतर फोडून त्यातील रक्कम पळविली. मात्र, स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी 24 तासांत या गुन्ह्याचा तपास लावून चोरलेली रक्कम जप्त केली आहे.
विशेष म्हणजे, चोरलेल्या पैशांमधून चोरट्याने लगेचच टीव्ही खरेदी केला होता. हा टीव्हीही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. नवीन टीव्ही, वाहन आणि तिजोरीतील सात लाख 20 हजारांपैकी एक लाख 44 हजार 800 रुपये जप्त केले आहेत.
चार तारखेला रात्री बँकेत चोरी झाल्यानंतर पाच तारखेला बँक व्यवस्थापकांनी घनसांवगी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली. किसान योजनेसाठी आलेली रक्कम बँकेच्या तिजोरीत ठेवली होती. सात लाख 20 हजारांची ही रक्कम चोरट्यांनी चारचाकी वाहनातून तिजोरीसह पळविली. चारचाकी वाहन बँकेच्या प्रवेशद्वाराला लावून बँकेमधील तिजोरी ढकलत-ढकलत आणून ती गाडीत घातली आणि जालन्यामध्ये आणली. त्यामधील तिजोरी लोखंडी हत्याराने फोडली आणि रक्कम काढून घेऊन शहरातील द्वारकानगरच्या जवळ असलेल्या तळ्यात रिकामी तिजोरी टाकून दिली.
हेही वाचा - दोन आमदार आणि पोलीस अधीक्षकांसह माजी आमदाराला कोरोनाची लागण
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना याविषयी माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी जालना शहरात शिकलकरी मोहल्ल्यात राहणाऱ्या हरदीपसिंग बाबूसिंग टाक या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने गोपीसिंग मलखानसिंग, कलानी किशोर सिंग ऊर्फ टाकल्या रामसिंग टाक या शिकलकरी मोहल्ल्यात राहणाऱ्या दोघा जणांसह जालना तालुक्यातील पाचन वडगाव येथील गजानन सोपान शिंगाडे यांच्या मदतीने ही चोरी केली असल्याची कबुली दिली.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी वरील चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रकमेपैकी एक लाख 44 हजार 800 रुपये, गोदरेज कंपनीची तिजोरी, गुन्ह्यामध्ये वापरलेली टाटा सुमो वाहन, मोटरसायकल तसेच चोरी केलेल्या पैशातून गजानन शिंगाडेने खरेदी केलेला 11 हजार 500 रुपयांचा नवाकोरा टीव्ही पोलिसांनी जप्त केला. पोलीस अधीक्षक चैतन्य यांनी या मुद्देमालाची पाहणी केली. या तपास कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, कृष्णा तगे, गोकुळसिंग कायटे, सॅम्युयल कांबळे आदींनी प्रयत्न केले.