जालना - शनिवार ते सोमवार सलग तीन दिवस सुटी असल्यामुळे भोकरदन शहरातील विविध बँकांच्या बाहेर नागरिकांची आज तोबा गर्दी झाली होती. दरम्यान काल (सोमवार) जालना शहरात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर देखील शहरातील बँकेतील गर्दीवर त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे दिसून आले.
हेही वाचा... वाशिममध्ये बँकेतून पैसे काढण्यासाठी रांगा, 'सोशल डिस्टन्सिंग'चा उडाला फज्जा
भोकरदन शहरातील गांधीचमन येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये थोडा वेगळा प्रकार दिसून आला. येथे बँक प्रशासनाकडून ग्राहकांसाठी बँकेच्या बाहेरच पैसे काढण्यासाठी लागणाऱ्या पावत्या ठेवण्यात आल्या होत्या. तसेच ग्राहकांना उभे राहण्यासाठी सावली नसल्यामुळेही ग्राहकांनी गर्दी न करता अंतर ठेवून बँक व्यवहार उरकण्याचे ठरवले. याउलट मात्र, शहरातील सेंट्रल बँक आणि देव गंगा चेंबर्स येथील बँकांच्या शाखेत पहायला मिळाला. सरोजनी देवी रोडवरील विजया बँकेमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. येथे पोलीस कर्मचारी असताना देखील त्यांना गर्दी पांगवता आली नाही. तसेच शहरातील एटीएममध्ये देखील खडखडाट असल्यामुळे ग्राहकांनी प्रत्यक्ष बँकेत गर्दी केली होती.