जालना - आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांचे जालन्यामध्ये उद्यापासून तीन दिवसीय सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. २ दिवसांमध्ये जवळपास २ लाख शेतकरी आणि सेवेकरी उपस्थित राहतील, अशी माहिती आयोजक प्राध्यापक पुरुषोत्तम वायाळ यांनी दिली.
मंठा रोडवर असलेल्या वाटूरजवळील श्री श्री ज्ञानमंदिर आश्रमात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता रविशंकर हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पुढील २ दिवस नैसर्गिक पद्धतीने शेती कशी करावी, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबत, स्किल ट्रेनिंग, व्यसनमुक्ती, जोडधंदे याप्रकारचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी ५० जणांची टीम तयार करुन प्रत्येक गावात जाऊन कार्यक्रमाविषयी माहिती देत असल्याचेही डॉक्टर वायाळ यांनी सांगितले.