जालना - जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र विघातक कृत्य विरोधी कायदा( एम पी डी ए)अन्वय स्थानबद्ध करण्यात आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिली.
गुन्हेगारावर आहेत 28 गुन्हे दाखल -
अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, शहरातील कैकाडी मोहल्ला, संजय नगर, डबल जीन, नूतन वसाहत, या भागामध्ये काही गुन्हेगार राहत आहेत. त्यांच्याकडून वारंवार गुन्ह्यांची संख्या वाढतच आहे. त्यासंदर्भात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केली आहे. मात्र त्यांचा स्वभाव बदलत नाहीत. अशा गुन्हेगारांपैकीच एक असलेल्या कैकाडी मोहल्ला येथील ऋषी भगवान जाधव (वय 34 ) याच्यावर 28 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जबरी चोरी करणे, हातभट्टीची दारू तयार करणे, शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल असून प्राणघातक हल्ला करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात या पूर्वीदेखील जाधव यांना तडीपार केले आहे मात्र त्यांची गुन्हा करण्याची प्रवृत्ती काही बदललेली नाही.
यापूर्वी देखील त्यांना हद्दपार केले होते मात्र सुटून आल्यानंतर पुन्हा गुन्हे करणे सुरू झाले आहे. त्यामुळे विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिनियम 1981 अंतर्गत अशा व्यक्तींना स्थानबद्ध करण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, यांनी 21 डिसेंबर रोजी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आणि विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 अन्वये आरोपींना स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ऋषी भगवान जाधव यांची औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी दिली. यावेळी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांचीही उपस्थिती होती.