जालना - महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने देण्यात येणारे कर्ज बँकेने मंजूर करावे, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून घनसांगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया समोर उपोषण सुरू आहे. आज या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. विशाल रामा निसर्गन असे उपोषणकर्त्याचे नाव आहे.
कर्ज मंजूर करण्यात टाळाटाळ
घनसांगी तालुक्यातील कंडारी येथील विशाल यांनी मार्च 2020 मध्ये महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ जालना, यांच्यामार्फत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीर्थपुरी शाखेत वेल्डिंगच्या दुकानासाठी कर्ज मागितले होते महामंडळामार्फत ही संचिका बँकेमध्ये 19 मार्च 2020 ला आली आहे. तेव्हापासून विशाल निसर्गन बँकेमध्ये चकरा मारून सदरील कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करत होते. मात्र, बँक व्यवस्थापनाने काही ना काही कारण सांगून कर्ज मंजूर करणे टाळत होते. यासंदर्भात विशाल यांनी दिनांक 13 मार्च 2021 ते दिनांक 23 मार्च 2021 या काळात बँकेला पत्र देऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तरीदेखील बँकेने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने 25 मार्च पासून निसर्गन यांनी तीर्थपुरी येथे बँकेच्या शाखेसमोर उपोषण सुरू केले .उपोषणाचा आज पाचवा दिवस असल्यामुळे उपोषणकर्त्यांची तब्येत चांगलीच खालावली आहे.
कर्ज मंजूर करण्याचा अधिकार तीर्थपुरी शाखेला
सध्या मार्च महिना असल्यामुळे बँकेचे ऑडिट चालू आहे. पुढील महिन्यात 20 तारखेनंतर या विषयावर चर्चा करण्यात येईल. तसेच हे कर्ज प्रकरण मंजूर करण्याचा अधिकार तीर्थपुरी शाखेला नसून सदरील संचिका मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविली असल्याची माहिती बँकेचे शाखाधिकारी सौरभ सागजकर यांनी दिली.