जालना -खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा आणि क्रुझरचा अंबड चौफुली वर भीषण अपघात झाल्याची घटना घडली .या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून आठ प्रवासी जखमी झाले आहेत. कदीम जालना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात भरती केले आहे.
बसचा समोरचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चांदस येथील 9 प्रवासी क्रुझर जीपने रामनगर साखर कारखाना येथे लग्नकार्यासाठी जात होते. या जीपला विदर्भातील यवतमाळहून मुंबईकडे 35 प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसने अंबड चौफुलीवर जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की जीप रस्त्याच्या कडेला तीन वेळा पलटी खात कोसळली. तसेच, खाजगी बसचा समोरचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात जीपमधील एक महिला प्रवासी जागीच ठार झाली तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर उपचार सुरू
अपघातात खाजगी बसचे या अपघातात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने एकही प्रवाशी जखमी झालेला नाही. जीपमधील जखमीवर संजीवनी हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती कळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री टाक यांच्यासह पोलीस कर्मचारी दीपक दाभाडे, राजू साळवे, उमेश साबळे, गजानन काकडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून जखमींना मदत केली.