जालना -जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने महिला बचत गटाच्या जीवनोन्नती अभियान 'उमेद' अंतर्गत बांधावर खत वाटप अभियानाला सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहांमध्ये आज खरीप हंगाम 2020 ची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी या अभियानाचे उद्घाटन केले.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या आणि जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना बांधावर खत उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून हा सर्व व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना एका खताच्या बॅगमध्ये किमान पंधरा रुपये फायदा होणार आहे. त्यासोबत वेळ आणि मेहनतही वाचणार आहे. एका बॅगमागे 15 रुपयांची बचत होत असल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर अनेक बॅगा लागतात आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचे हजारो रुपये वाचणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी महिला बचत गटांकडे खताची नोंदणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बाजारामध्ये युरियाचे पोते 266 रुपयांना आहे, ते बांधावर 260 रुपयांना, तर 10: 26: 26 या खताचे पोते बाजारात 1150 रुपयांना मिळते, ते बांधावर 1135 रुपयांना मिळणार आहे. नगदी फायद्यासोबतच शेतकऱ्यांना खताची चढउतार करण्यासाठी द्यावी लागणारी हमाली, वाहतुकीचा खर्च, खताची गळती हे सर्व काही वाचणार आहे. तिहेरी फायदा या बचत गटांकडून बांधावर मिळणाऱ्या खतांमुळे होणार आहे.
आज सुरू झालेल्या या अभियानामध्ये रामनगर प्रभागातील 31 स्वयंसहाय्यता गटातील 50 शेतकरी महिलांना खत वाटप करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह राज्यमंत्री संदिपान भुमरे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती क्षीरसागर, कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, उमेद अभियानाचे व्यवस्थापक शैलेश चौधरी ,गणेश तिडके, राजू राठोड, गौतम प्रधान आदींची उपस्थिती होती.