जालना - तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा नीती आयोगाने केंद्राला दिला आहे. अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. नीती आयोगाने असा कोणताही इशारा राज्याला दिलेला नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिले आहे.
हेही वाचा - सगळ्याच सरकारने आरोग्य सुविधेकडे दुर्लक्ष केले - आरोग्य मंत्री राजेश टोपे
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी असा इशारा नीती आयोगाने दिला होता. नीती आयोग आणि केंद्राने त्यावेळी दिलेल्या सूचनांचे राज्य पालन करत असल्याचे टोपे म्हणाले. ऑक्सिजन, बेड्स, लहान मुलांचे वार्ड याबाबतीत राज्याचं नियोजन आणि त्यावर काम सुरु असल्याचं देखील ते म्हणाले. शिवाय राज्यातील आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील रिक्त जागा तसेच डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्याचे काम तातडीने पूर्ण करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
- नीती आयोगाचा केंद्राला सावधगिरीचा इशारा
कोरोना विरोधी लढाईत लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत आहे. तसेच सध्या कोरोनाची रुग्णसंख्याही कमी होत आहे. पण आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. आता नीती आयोगानेही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारला सावध करत इशारा दिला आहे. पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये रोज कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ४ ते ५ लाखांपर्यंत आढळून येऊ शकते. यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला किमान २ लाख ICU बेड्सची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, असं नीती आयोगाने सरकारला म्हटले आहे.
हेही वाचा - राजेश टोपे यांना बांधली बहिणीने राखी, येणाऱ्या सर्व सणांमध्ये कोरोना नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन