जालना - जिल्हा परिषद सध्या कंत्राटी आरोग्य कर्मचारी, उमेद अंतर्गत असलेले कंत्राटी कर्मचारी, निवासी आश्रम शाळा यांच्या प्रश्नांबाबत चर्चेत आहे. तर दुसरीकडे मात्र जालना जिल्हा परिषदेच्या गुणवत्तेचा डंका राज्यात वाजत आहे. जिल्हा परिषदेकडून सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट) प्रशिक्षण घेण्यासाठी इतर जिल्ह्यातील मंडळीही जालन्यात येत आहे. त्याची सुरुवात आज, रविवारी नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथे येऊन प्रशिक्षण घेऊन सुरू केली.
सीएमपी प्रणालीचे घेतले प्रशिक्षण -
प्रचलित पद्धतीमुळे शिक्षकांचे पगार होण्यासाठी आठ ते दहा दिवस लागत होते. मात्र, सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रोडक्ट् अर्थात रोख रकमेचे हस्तांतरण) या प्रणाली अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त अधिकाऱ्यांनी संगणकावर एका केलेल्या क्लिकमुळे सर्वच्या सर्व शिक्षकांच्या खात्यावर अवघ्या तीन मिनिटांत हा पगार जमा होतो आणि संबंधिताला संदेश जातो. महाराष्ट्रात जालना जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद आहे की, ज्या जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी 2019 मध्ये हा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला. तसेच तो यशस्वीही करून दाखवला. शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यामुळे वेळेची बचत होऊन शिक्षकांना वेळेवर पगार होण्यासाठी मदत झाली आहे. याच प्रणालीची माहिती घेण्यासाठीच नंदुरबार जिल्हा परिषदेचे अधिकारी आज (सोमवारी) आले.
हेही वाचा - सामाजिक सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची महत्वपूर्ण भूमिका
7हजार ट्रांजेक्शन एका क्लिकवर -
जालना जिल्हा परिषद अंतर्गत 1522 शाळा आहेत. त्यात पाच हजार 700 शिक्षक आहेत. त्यांच्यासोबतच शिक्षकेतर कर्मचारी धरून ही संख्या सात हजारांच्या जवळपास जाते. या सातही हजार कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त अधिकारी यांनी संगणकावर 1 क्लिक करताच त्यांच्या खात्यात जमा होते. त्यामुळे प्रचलित प्रणालीमध्ये लागणारा वेळ बचत होऊन अधिकाऱ्यांना इतर कामावर लक्ष देता येते.
कोणी दिले कोणी घेतले प्रशिक्षण -
सीएमपी प्रणालीचे प्रशिक्षण जालना जिल्हा परिषदेचे जिल्हा समन्वयक संतोष पिंपळे यांनी दिले. हे प्रशिक्षण घेण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग यांच्यासह सह अन्य आठ शिक्षकांसह असे एकूण दहा कर्मचारी हे प्रशिक्षण घेण्यासाठी आले होते.