जालना - जिल्हा परिषदेत विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडीसाठी आज (गुरुवारी) विशेष सभा बोलावण्यात आली होती. मात्र, या सभेचे सदस्यांना निमंत्रणच गेले नाही, असे कारण सांगत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सभेत गोंधळ घातला. तसेच आजची ही सभा पुढे ढकलण्याची मागणी केली.
दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव नामदेव केंद्रे यांनी सर्व सदस्यांना सर्व पद्धतीने सभेच्या सूचना दिल्या आहेत, असे सांगितले. मात्र, तरीदेखील जिल्हा परिषद सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर केंद्रे यांनी सदस्यांना पाठवलेल्या सूचनांची पोच-पावती देखील दाखवली. मात्र, त्यावरदेखील सदस्यांनी आक्षेप घेतला आणि या सह्या आमच्या नाहीत, असे म्हणत परत गोंधळ घातला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी हस्तक्षेप करून जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या पत्त्यावरच नोटीस पाठवलेल्या आहेत, असे सांगितले. तसेच यापुढे सभागृहात जो पत्ता देण्यात येईल त्यावरच नोटीस पाठवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावरही सदस्यांचे समाधान न झाल्याने हौदामध्ये उतरून सदस्यांनी गोंधळ चालूच ठेवला. शेवटी सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांनी जाहीर माफी मागितली. यानंतर पुढील कामकाजाला सुरुवात झाली.
हेही वाचा - 'एखाद्या प्रकल्पाला विरोध म्हणजे विकासाला विरोध नाही'
केंद्रे यांनी अनवधानाने नोटीस पाठवलेल्या पत्त्याविषयी खात्री केल्यानंतर जर यावरही सदस्यांचे समाधान होत नसेल तर त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी कराव्यात असे सांगितले होते. मात्र, भाजप सदस्य सदस्यांचा संताप झाला आणि सचिवांनी माफी मागितल्याशिवाय कामकाज न होऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेवटी मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव नामदेव केंद्रे यांनी सभागृहाची माफी मागितली आणि पुढील कामकाजाला सुरुवात झाली.