जालना - तालुक्यातील सारवाडी या गावात पाण्याच्या शोधात आलेल्या वानराला विद्यूत तारेचा धक्का लागला. त्यामुळे ते जखमी होऊन बेशुद्ध पडले. यावेळी गावकऱ्यांनी त्यास मृत समजून अंत्यविधीची तयारी सुरू केली. मात्र, अचानक ते वानर हालचाल करू लागल्याने तत्काळ ही माहिती वनविभागाला देण्यात आली.
या सर्व घटनेची तत्काळ माहिती वनविभागाला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, वन्यजीव छायाचित्रकार, प्राणीमित्र ज्ञानेश्वर गिराम यांनी दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत इटलोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सतीश बुरकुल यांनी तत्काळ वनविभागाची गाडी आणि पिंजरा काही कर्मचाऱ्यांसह सारवाडी गावाकडे रवाना केला. तोपर्यंत वानर शुद्धीवर आले होते. यावेळी गावातील बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.
गावकऱ्यांनी त्या वानरास शाळेच्या शौचालयात बंदिस्त केले. त्यानंतर वनकर्मचारी आणि गावातील तरुणांच्या मदतीने त्यास शिताफीने पिंजऱ्यात बंदिस्त केले. सदरील घटनेचा पंचनामा करण्यात आल्यानंतर जखमी वानरास वनविभागाच्या स्वाधीन करून उपचारासाठी पशु वैद्यकीय दवाखान्यात उपचारार्थ हलविण्यात आले. उपचारानंतर त्यास निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात येणार असल्याचे वनपाल सतीश बुरकुल यांनी सांगितले.
कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतातील आणि रानावनातील पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पशु-पक्षी हे गावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी या पशु-पक्षांसाठी पिण्याचे पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. जेणे करून या प्राण्यांचा उपद्रव होणार नाही किंवा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.
या मदतकार्यात वनविभागाचे सहकार्य लाभले तर गावातील तरुण मित्र मंडळांनीही सहकार्य केले. तसेच यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोवर्धन काळे, वनकर्मचारी भास्कर भाटसोडे आणि वाहन चालक पांडुरंग डोंगरे, शिक्षक अनंतकुमार शिलवंत, योगेश गणेश पडुळ, सुभाष पंढरीनाथ काळे, दाविद कमाने, कृष्णा कारभारी काळे, जनार्धन काळूबा काळे, एकनाथ आबाजी काळे, दत्तू दिगंबर काळे, योगेश ज्ञानेश्वर काळे, विकास विलास काळे यांनी मोलाची मदत केली.