जालना - नारायण राणेंना बाळासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखायला नको होते,असे गलिच्छ राजकारण फक्त शिवसेनाच करु शकते, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास शिवसेनेकडून विरोध करण्यात आला, असा विरोध कधीही होता कामा नये. दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांच्या समाधीचे दर्शन अनेकजण घेतात. पण राणेंना विरोध करून शिवसेनाच गलिच्छ राजकारण करु शकते, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. ते जालन्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
आज नांदेडमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे मूक आंदोलन करत आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. काल भागवत कराड यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. हे कार्यकर्ते पक्षाचे असतील असे वाटत नाही, असे सांगत पंकजा मुंडे भाजपामध्ये नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी हा वर्षभर बैलांना जीव लावत असून बैलगाडा शर्यत ही पारंपारीक आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात यावी याबाबत राष्ट्रपतींकडे देखील मागणी करण्यात आली आहे, असे सांगत दानवे यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला.
हेही वाचा - नारायण राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा, म्हणाले बाळासाहेबांचे आशीर्वाद डोक्यावर आहेत