जालना - 'मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. उद्यापासून (2 मे) लॉकडाऊनची अधिक कडक अंमलबजावणी करावी', असे आदेश राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज (1 मे) जालना जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले.
राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई हे आज जालन्यात आले होते. पोलीस प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. तसेच, उद्यापासून वाढलेल्या लॉकडाऊनमध्ये पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, असे आदेशही दिले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाई हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
कोरोनामृत पोलिसांना मदत
पुढे बोलताना देसाई म्हणाले, की 'जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलिसांच्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहोत. मागच्या लॉकडाऊनमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी काम केले, त्यापैकी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यापैकी तिघांना शासनाने निकषानुसार मदत केलेली आहे. उर्वरित दोघांना मदत करण्यासाठी ते शासनाच्या निकषात बसतात किंवा नाही, या बाबीदेखील पडताळून पाहिल्या जात आहेत. त्या योग्य असतील तर त्यांनाही लवकरच मदत मिळेल'.
खुलेआम दारू विक्री करणाऱ्यावर कारवाईचे आदेश
देसाई हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही राज्यमंत्री असल्यामुळे पत्रकारांनी शहरात सुरू असलेल्या दारूच्या व्यवसायाबद्दल अनेक तक्रारी केल्या. शहरामध्ये खुलेआम दारू विक्री सुरू आहे. प्रत्यक्षात शासन निर्णयानुसार ही दारू घरपोच द्यायला हवी. मात्र, तसे न करता दारू विक्रेते दारूची विक्री ही दुकानातूनच करत असल्याची बाब देसाई यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, देसाई यांनी अशा ठिकाणी धाडसत्र सुरू करावे, अशा सूचनाही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांना दिल्या आहेत. दरम्यान, आज झालेल्या पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी कोरोना संदर्भातील प्रश्न सोडून इतर कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले.
हेही वाचा - राज्यात 63 हजार 282 रुग्णांची नोंद
हेही वाचा - महाराष्ट्र दिनाचा मध्य रेल्वेला विसर, 'सीएसएमटी' रेल्वे स्थानकावर विद्युत रोषणाई नाही