जालना - लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वत्र आता मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून येईल असे छातीठोकपणे सांगत आहे. असे असले तरीही प्रत्येकाच्या मनामध्ये धाकधुक मात्र कायम आहे. असे असतानाही गुलाल आमच्याच अंगावर पडेल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदू धर्माला मानणारे आहेत. त्यामुळे पक्षाच्या विजयासाठी या दोन्हीही पक्षाच्या वतीने विविध फंडे केले जातात. कधी अभिषेक, कधी दान धर्म, कधी महाआरती, कधी देव पाण्यात ठेवणे, अशा प्रकारचे नवस केले जातात. त्यामुळे यावेळी जालन्यात भाजप विजयी व्हावे म्हणून देव पाण्यात ठेवले आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मिस्कीलपणे विषय हाताळला. ते म्हणाले "आमचा विजय हा निश्चितच आहे, फक्त आता अधिकृतपणे घोषणा करण्याची बाकी आहे, त्यामुळे देव पाण्यात ठेवण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.
आज सकाळपासूनच भाजप कार्यालयांमध्ये उद्यासाठीच्या मतमोजणीच्या कामाची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्याची गडबड सुरू झाली आहे. प्रत्येकाची ओळखपत्रे, ठरवून दिलेला टेबल, त्या विषयी सूचना भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना देण्यात येत आहेत. त्याचसोबत भोकरदन नाका येथे असलेल्या खासदार रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी काही मान्यवरांनी भेट दिली आणि चर्चा केली.