जालना Maratha Reservation Row : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हिंसक होण्याची शक्यता असल्यानं त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. गुणरत्न सदावर्ते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच वकील गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणाविरोधात बोलत आहेत. मात्र मराठा समाजामुळे भाजपाचे 106 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणात आपली माणसं सोडू नये, अशी समज द्यावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं केली. मराठा आरक्षण द्या, अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांना विनंती अन् इशारा : मनोज जरांगे पाटील यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची विनंती केली. मराठा समाज हा सगळ्यात मोठा समाज आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या हालअपेष्टा करू नका. गोरगरीब मराठा समाजातील पोराबाळांना आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. मात्र मराठा समाज आता दहा दिवस थांबण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सांगतो, हे आग्या मोहोळ शांत आहे, ते उठलं, तर आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
मराठा आरक्षण द्या, ट्रकभर गुलाल घेऊन दिल्लीत येऊ : देवेंद्र फडणवीस हे त्यांचे कार्यकर्ते मराठा आंदोलकांच्या अंगावर घालत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी, असंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे पंतचप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना, त्यांचे कार्यकर्ते मराठा आंदोलकांवर न सोडण्याची समज द्यावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं केली. तुम्ही मराठा आरक्षण दिलं, तर दिल्लीत ट्रकभर गुलाल घेऊन येऊ, असंही मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
10 दिवसात मराठा आरक्षण द्या : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आज आंतरवली सराटी इथं मराठा समाजाचा मेळावा घेतला. या मेळा व्यात मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दहा दिवसात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. दहा दिवसात मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास पुढंची दिशा ठरवावी लागेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
अंत्ययात्रा निघेल किंवा विजययात्रा : मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवली सराटी इथं मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रणाणपत्र देण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आगामी दहा दिवसात मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याचा इशारा सरकारला दिला आहे. आता मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं आहे. हे आग्या मोहोळ अद्याप उठलं नाही, हे आग्या मोहोळ उठलं, तर मोठा राजकारण्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आता एक पाऊलही मागं घेणार नसून अंत्ययात्रा निघेल, नाहीतर विजययात्रा असंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पाच हजार पुरावे दिले आता काय ट्रकभर द्यायचे का : मराठा समाजाला कुणबी असल्याचे दाखले देण्यास कायदेशीर आधार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं. मात्र आता समितीला 5 हजार पुरावे दिले आहेत. त्याचा आधार घेऊन मराठा समाजाला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. 5 हजार पुरावे सरकारला पुरेसे नाही, तर मग आता ट्रकभर पुरावे द्यायचे का, असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
हेही वाचा :