जालना - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे आजपासून मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. समाजाच्या वतीने गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली.
हेही वाचा - लसीकरणात आरोग्य यंत्रणेला अपयश, कोरोना लसीकरणाकडे लाभार्थ्यांची पाठ
मिरवणुकीने सुरुवात
शहागड-पैठण रस्त्यावर शहागडपासून दहा किलोमीटर अंतरावर साष्ट पिंपळगाव हे गाव आहे. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास मराठा समाजाच्या वतीने वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. गावामध्ये फिरून आल्यानंतर या मिरवणुकीचे सभेमध्ये रुपांतर झाले. दरम्यान, मिरवणुकीमध्ये महिलांची संख्या प्रचंड होती. तर, पुरुषांनी देखील लेझीमच्या तालावर मिरवणुकीत सहभाग नोंदविला.
आंदोलन लांबले
मराठा आरक्षणाचा निकाल 25 जानेवारीला लागणार होता. त्यामुळे, या निकालाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू ठेवायचे, की बंद करायचे, हा निर्णय होणार होता. परंतु, आता ही सुनावणी ५ फेब्रुवारी तारखेपर्यंत लांबविली असल्यामुळे आंदोलन पाच तारखेपर्यंत सुरू राहणार असल्याचे समजले आहे.
राज्यातील मान्यवरांची हजेरी
राज्यभरातील समन्वयक या कार्यक्रमासाठी येतील असा अंदाज व्यक्त करत आंदोलकांनी तयारी केली होती. त्यानुसार जिल्हा वगळता इतर ठिकाणच्या पंधरा समन्वयकांनी इथे हजेरी लावली. तसेच, सुमारे पंचवीस हजार आंदोलक यामध्ये सहभागी होतील असा अंदाजही आयोजकांनी व्यक्त केला होता. मात्र, पोलिसांच्या अंदाजानुसार सुमारे हजार आंदोलकांची इथे उपस्थिती होती.
हेही वाचा - जालना जिल्ह्यातील मेटारोल इस्पात कंपनीत स्फोट; १ ठार, १ जखमी