वडीगोद्री (जालना) Maratha Reservation : वंशावळीच्या नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश शासनानं दिले आहेत. शासनानं घेतलेला निर्णय चांगला आहे, मात्र मराठा समाजाला वंशवळ या शब्दाऐवजी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, शासनानं काढलेल्या परिपत्रकात दुरुस्ती करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.
आमच्याकडं वंशावळीचा पुरावा नाही : आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे म्हणाले की, ज्या मराठा समाजाकडं कुणबी असल्याची नोंद आहे, त्यांना आजपासून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याचं मराठा समाजातून कौतुक होत आहे. मात्र वंशावळीच्या नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, अशी अट आहे. पण आमच्याकडं कुणाचा वंशावळीचा पुरावा नाही. मुख्यमंत्री तसंच दोन उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या निर्णय क्षमतेचं कौतुक आहे. पण, घेतलेल्या निर्णयाचा समाजाला फायदा होणार नाही, असं जरांगे पाटलांचं मत आहे.
जरांगे पाटील यांना 3 गोष्टींचं आश्वासन : राज्य सरकारच्यावतीनं माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काल राज्य सरकारनं काढलेला जीआर जरांगे पाटील यांच्याकडे खोतकर यांनी सुपूर्द केला. यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले, की, मुख्यमंत्र्यांचा निरोप मी मनोज जरांगे पाटील यांना दिला. सरकारच्या वतीनं जरांगे पाटील यांना 3 गोष्टींचं आश्वासन देण्यात आलंय.
चर्चेसाठी मंत्रालयात यावं : ज्यांच्याकडे कुणबी कागदपत्रे आहेत त्यांना दिलासा मिळालाय. जीआर काढणं, गुन्हे मागे घेणं, दोषींवर कारवाई या तिन्ही गोष्टी सरकारनं केल्या आहेत. जरांगे पाटील यांची यंत्रणा आमच्यापेक्षा मजबूत दिसताय. आम्ही जीआर आणण्यापूर्वीच त्यांनी सकाळी जीआर नाकारला होता. मी राज्य सरकारच्या वतीनं विनंती करण्यासाठी येथे आलो आहे. जीआर फेटाळला असला, तरी जरांगे पाटील यांना या जीआरमध्ये सुधारणा सुचवायच्या असतील तर त्यांनी प्रत्यक्ष चर्चेसाठी मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह,वर्षा बंगल्यावर यावं. जरांगे पाटील उपस्थित राहू शकत नसल्यास त्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन सरकारशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
उपोषण सुरूच : याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमचं शिष्टमंडळ मुंबईत जाऊन सरकारशी चर्चा करण्यास तयार आहे, शिष्टमंडळाचं नेते, तुम्ही सुधारित नवीन जीआर काढत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. वंशावळी हा शब्द काढून गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे न घेण्याची भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा -