जालना Manoj Jarange Patil : आम्ही महापुरुषांच्या जाती कधीही काढल्या नाहीत. आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही. राज्यात एक वाया गेलेलं मंत्री आहे. त्यांनी महाराष्ट्र सदन खाल्लं आणि आत जाऊनही आले. ते उगीच माझ्या नादाला लागत आहेत. मी लय यडपाट गडी आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal) यांनी छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता पुन्हा तोफ डागली.
राज्य सरकारला इशारा : तुम्ही मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले, त्यांना अटकही केली. २ दिवसात अंतरवालीचे तर एका महिन्यात राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला केली. हा शब्द पाळला नाही तर तुम्ही विश्वासघातकी असेही ठरु शकता. आमच्यासोबत दगाफटका करु नका. आमच्या मुलांवर गोळ्या झाडल्या. तुम्ही आमच्याशी दगाफटका करता, असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. तुम्ही सांगा की तुम्हाला अटक करतोय. आम्ही ५ कोटी मराठे अटक करुन घेतो. एका मंत्र्यांच्या दबावामुळं दोन महिन्यांनंतर आमच्या लोकांना अटक केली. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी समाजाचा रोष ओढावून घेऊ नये, अशी विनंतीही मनोज जरांगे पाटील यांनी केली.
२४ डिसेंबरच्या आत आरक्षण द्या : काही लोकं जातीवाद करत आहेत. दंगली भडकावण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण करुन देऊ नका. फक्त तुम्ही शांततेत २४ डिसेंबरपर्यंत आंदोलन करा. यापुढं काहीही सहन केलं जाणार नाही. त्यांना गर्दी जमवण्यासाठी धनगर बांधव लागतो, असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा का कामावर घेतलं? शब्द दिला होता की गुन्हे मागे घेऊ. मग अजूनही का गुन्हे मागे नाही घेतले. २४ डिसेंबरच्या आत आम्हाला आरक्षण द्या. नाहीतर तुम्हाला जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय.
निष्पाप लोकांना अटक कोण करतंय? : मर्यादा आणि संयम किती दिवस बाळगायचा यालाही काही मर्यादा आहेत. जाणून बुजून काही जणांना अटक केली आहे. निष्पाप लोकांना तुम्ही आतमध्ये टाकलं आहे. क्लिप व्हायरल केली म्हणून एकजण आत आहे. त्याचा प्रत्यक्ष काहीही संबंध नाही. स्थानिक प्रशासन अटक करतंय का गृहमंत्री त्यांना अटक करायला सांगतायत, ते आधी स्पष्ट करा. मुद्दाम अटक करण्यात येत आहे, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.
नारायण कुचे, धनंजय मुंडेंवर टीका : नारायण कुचे यांनी काड्या केल्या : नारायण कुचे साहेब तुम्हाला मी खूप मानतो. मात्र, तुम्ही काड्या लावल्या आहेत. तुमचं नाव मी नाही घेतलं. रावसाहेब दानवे यांचं नावही मी नाही घेतलं. मग ओबीसींच्या नेत्याला काड्या लावतो हे बरोबर नाही, असं सांगून कुचे यांच्यावर जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही जरांगे पाटील यांनी टीका केली. तुम्ही जात प्रमाणपत्र कक्ष बंद केलेत अशी माहिती आहे. ते पुन्हा कक्ष सुरू करा आणि जात प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, अन्याथा जड जाईल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय.
हेही वाचा -