जालना Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं दुसऱ्या टप्प्यातील उपोषण 25 ऑक्टोबरपासून सुरू आहे. रविवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता. त्यांची तब्येत खालावत असल्यानं पाणी पिण्याची विनंती आंदोलकांनी केली होती. आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगे हे घोटभर पाणी प्यायले. आंदोलकांच्या मागणीनंतर मनोज जरांगे यांनी पाण्याचा एक घोट घेतलाय.
जरांगे पाटील पाण्याचा घोट प्यायले : आंदोलकांच्या आग्रहावरून मनोज जरांगे पाटील हे पाण्याचा घोट प्यायले. मात्र, यानंतर मी पाणी पुन्हा पिणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिलाय. मात्र, यावेळी त्यांनी डॉक्टरांना तपासण्यापासून रोखल्याचंही दिसून आलं. मनोज जरांगे यांनीही आंदोलकांना भावनिक न होण्याचं आवाहन केलंय. तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांनाही मनोज जरांगे यांनी नकार दिलाय.
यापुढे काहीही घेणार नाही : मनोज जरांगे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस होता. मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळं आंदोलक त्यांना किमान पाणी घ्या, अशी विनंती करत होते. खूप विनवणी केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पाण्याचा एक घोट घेतलाय. मात्र, यापुढे काहीही घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय.
मुठीत धरून लढावं लागेल : मी तुमचं प्रेम हिरावून घेणार नाही. परंतु, पाणी पिणं, सलाईन लावणं आपल्या आंदोलनाला हानी पोहोचवू शकतं. आपल्या न्यायाचा दिवस जवळ आलाय. कुणाला तरी जीव मुठीत धरून लढावं लागेल. मला माझ्या वेदना माहिती आहेत. त्यामुळं भावनिक होऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे यांनी यावेळी आंदोलकांना केलंय.
राजीनामा देण्यापेक्षा एकत्र या : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलाय. यावर मनोज जरांगे यांनीही आमदार-खासदारांना राजीनामा न देण्याचं आवाहन केलंय. यावर बोलताना ते म्हणाले की, राजीनामा देऊन आमची संख्या कमी होईल. राजीनामा देण्यापेक्षा संघटित व्हा, मुंबईत बसून सरकारवर हल्लाबोल करा. राजीनामा देऊ नका, सर्वांनी मुंबईकडे कूच करा. समाज तुम्हाला कधीच विसरणार नाही.
अंतरवलीत चर्चा करण्यास तयार : जरांगे यांनी सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, यावेळी त्यांनी ही चर्चा अंतरवली सराटीच्या व्यासपीठावरच होणार असल्याचं ठणकावलं आहे. सरकारतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेची तयारी दाखवलीय. आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मात्र, ही चर्चा अंतरवली सराटीच्या व्यासपीठावरच होणार असल्याचं जरांगे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
हेही वाचा -