जालना - शहरात एक जूनपासून सुरू झालेल्या आंबा महोत्सवामध्ये जालनेकरांनी रत्नागिरी आणि देवगड येथून आलेल्या हापूस आंब्यांवर मनसोक्त ताव मारला. शेतकऱ्यांना यातून सुमारे 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
शहरात जुना मोंढा भागात दिनांक 1 जूनपासून 4 जूनपर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाकडे स्थानिक विक्रेत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी पाठ फिरविली. परंतु कोकणातून देवगड आणि रत्नागिरी येथील हापूस आंब्याच्या सात शेतकऱ्यांनी त्यांच्या परिवारातील 15 माणसांसह या आंबा महोत्सवात आपली दुकाने थाटली होती.
रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकरराव दळवी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची टीम जालन्यात आली होती. त्यामध्ये उदय पेठे, संजय खानविलकर, संदीप भदाणे, निलेश चव्हाण, अल्पेश भोसले, दिगंबर मयेकर, विजय मोहिते यांचा समावेश होता. तीनशे ते सहाशे रुपये प्रमाणे 2 डझन च्या दरम्यान वेगवेगळ्या गुणवत्तेचा हा हापूस आंबा होता. एका पेटीमध्ये सुमारे चार ते पाच डझन आंब्यांची संख्या असलेल्या अकराशे पेट्या विकल्या गेल्याचा दावा मधुकर दळवी यांनी केला आहे. अकराशे पेट्या म्हणजे पाच हजार डझन आंबा आणि त्याची सरासरी किंमत 300 रुपये डझन लावली तर 20 लाख रुपयांचा हापूस आंबा चार दिवसांमध्ये जालनेकरांनी फस्त केला आहे.
रत्नागिरी ते जालना या वाहतुकीला सुमारे एक लाख रुपये खर्च आणि जालन्यामध्ये राहण्यासाठी या शेतकऱ्यांना एक लाख रुपये खर्च, असे दोन लाख वगळता 15 लाखाचे उत्पन्न चार दिवसांमध्ये या शेतकऱ्यांना झाले आहे. झालेल्या या व्यवसायाबद्दल या शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे लक्ष्मण दळवी, मधुकर दळवी यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर जालन्यामध्ये आंबा शौकीन आहेत, मात्र आंबा खाणाऱ्यांच्या संख्येमध्ये आणि एकूणच जालनेकरांमध्ये घासाघीस करण्याची प्रवृत्ती जाणवत आहे. याउलट औरंगाबाद लातूर नाशिक येथे मात्र ग्राहकांनी घासाघीस न करता मिळालेली गुणवत्ता यावर समाधान व्यक्त करून जालन्यापेक्षा चांगला भाव मिळाला, असेही दळवी यांनी सांगितले.