जालना - पाझर तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला दुसऱ्याच व्यक्तीला मिळाल्याप्रकरणी अंबड तालुक्यातील रामनगर तांडा येथील भीमराव खिराजी पवार 2004 सालापासून शासन दरबारी चकरा मारत आहेत. गेले २ वर्ष ते लोकशाही दिनाच्या दिवशी येऊन न्याय मिळावा यासाठी अर्ज करतात. वारंवार अर्ज करूनही प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोर चक्क उठाबशाही काढल्या.
हेही वाचा - जालना : वाळू तस्करीप्रकरणी जप्त केलेले दोन ट्रक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून गायब
लोकशाही दिनी पवार यांच्या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. मात्र, प्रकरणात तांत्रिक त्रुटी असल्याचे कारण प्रशासनाने दिले आहे. यावेळी पवार आपल्या अपंग मुलीसह कार्यालयात आले होते. त्यांनी प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रांचा गठ्ठादेखील सोबत आणला होता. गेल्या २ वर्षांपासून आपल्याला असेच उत्तर मिळत असून काहीतरी ठोस निर्णय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर पुढच्या लोकशाही दिनापर्यंत न्याय मिळाला नाही, तर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.