जालना : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे स्पष्ट निर्देश नसल्यामुळे ही आरोग्य योजना आत्तापर्यंत फक्त 83 कोरोनाबाधित रुग्णांना उपयोगी पडलेली आहे. या रुग्णांचा खर्च आरोग्य योजनेतून त्या त्या रुग्णालयाला दिला जाणार आहे. प्रत्यक्षात जालना जिल्ह्यामध्ये सहा हजार पेक्षाही जास्त कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यापैकी 50 टक्के रुग्णांनी कोविड-१९ रुग्णालयांंतर्गत उपचार घेतले. तर, उर्वरित तीन हजार रुग्णांपैकी फक्त 83 रुग्णांनाच कोरोनाचे पॅकेज मिळाल्यामुळे त्यांना कुठलाही खर्च भरावा लागला नाही.
मात्र, दुसरीकडे या आरोग्य योजनेअंतर्गत कोरोनाबाधित रुग्णाला कॅशलेस सेवा मिळेल, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला होता. परंतु, प्रत्यक्षात तसे न होता जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या चार खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून मोठ्याप्रमाणावर बिल वसूल केले. शहरामध्ये आस्था हॉस्पिटल, दीपक हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, आणि संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे चार हॉस्पिटल खासगी रुग्णालय म्हणून शासनाने जाहीर केले आहे. जे रुग्ण उपचार घेऊन गेले ते रुग्ण जास्त बिल आकारल्याच्या तक्रारी आरोग्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे करत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी नुकत्याच विवेकानंद हॉस्पिटल आणि संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर कारवाई संदर्भात आदेश बजावले आहेत. त्यामुळे रुग्ण, रुग्णालय आणि प्रशासन यांच्यामधील वाद वाढायला लागले आहेत. पर्यायाने स्पष्ट निर्देश नसल्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजना ही सर्वांसाठीच डोकेदुखीची योजना ठरत आहे.
शासन निर्देशानुसार सर्वच कोरोनाबाधित रुग्णांना या आरोग्य योजनेत फायदा मिळणार नाही. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास आहे आणि कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागणार आहे, अशाच रुग्णांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. हा फायदा 20 ते 85 हजार रुपयांच्या दरम्यान मिळू शकतो. मात्र, ज्यांना फक्त कोरोनाची लक्षणे आहेत अशा रुग्णांना याचा फायदा मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्ण त्यांच्या सोयीने याचा अर्थ लावतात आणि रुग्णालयाच्या प्रशासनासोबत वाद घालत आहेत.
या जनआरोग्य योजनेसंदर्भात कोणत्याही स्पष्ट सूचना नसल्यामुळे डॉक्टरांवर होणाऱ्या कारवाईसंदर्भात जालना शहरातील नामवंत डॉक्टरांनी 31 ऑगस्टरोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेतली. प्रशासन आणि रुग्णालय व्यवस्थापन यांच्यामध्ये वाढत असलेल्या तणावाबद्दल माहिती दिली. तसेच, बिलाच्या संदर्भात सुसूत्रता आणण्याची मागणीही केली. आरोग्यमंत्र्यांना भेटलेल्या पथकामध्ये डॉ. संजय राख डॉ.पाकणीकर, डॉ. मोजेस, डॉ.बळीराम बागल, डॉ. आदिनाथ पाटील, डॉ. भूषण मणियार, डॉ.आनंद बोरीवाले, डॉ. उमेश करवा यांची उपस्थिती होती.