जालना- सद्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये घटनेची पायमल्ली होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अवस्था अस्थिर झाली आहे. अशावेळी वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण समितीचे सभापती तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी सदस्य, सुदामराव सदाशिव यांनी शनिवारी दिली.
सदाशिव यांनी काल भारिप बहुजन महासंघामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सदाशिव म्हणाले की, घटनेची पायमल्ली होत असल्यामुळे समाजातील दलित, आदिवासी, ओबीसी, घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना धीर देण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी आपण या पक्षात प्रवेश केला आहे. निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भारिप बहुजन पक्षाच्या विचारधारेची पायमल्ली करीत आहेत. मात्र पक्षाचे विचार चांगले आहेत असे ते म्हणाले.
यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके यांच्यासह राजेश राऊत, एड. कैलास रत्नपारखे, अकबर इनामदार, डावकरे, प्रा. राजकुमार मस्के, उपस्थित होते.