औरंगाबाद - लोकसभेची निवडणूक २३ एप्रिलला पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ८ एप्रिलपर्यंत होती. शेवटच्या दिवशी अखेर सात उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता २३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपलं नशीब आजमावणार आहेत.
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता २३ उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. ८ एप्रिलला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. शेवटच्या दिवसअखेर ७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता खरी लढत सुरू झाली असून २३ उमेदवारांनी प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ३७ भरारी पथके तयार केली होती. त्याचबरोबर थेट कॅमेराच्या देखरेखीखालील ३५ पथकेही तयार करण्यात आलेले आहेत. या सर्व पथकांनी कारवाई करत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास ५४ लाखांची रोख रक्कम आणि बारा हजार लीटर अवैध दारू जप्त केल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यात १३ हजार ६९५ कर्मचारी मतदान केंद्रावर काम करणार आहेत. जिल्ह्यामध्ये ३०६७ मतदान केंद्र असून त्यामध्ये २०२१ मतदान केंद्र ही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येतात, तर उर्वरित मतदारकेंद्रेही जालना मतदारसंघात येतात. निवडणूक काळात काही निर्बंध हे उमेदवारांना असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम मशीन आणि एक व्हीव्हीपॅट मशीन लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ६७०० बॅलेट युनिट देखील असणार आहेत. त्यांचं मत हे पोस्टाद्वारे मागण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. आचारसंहितेच्या काळामध्ये प्रचार करत असताना अनेक निर्बंध हे प्रत्येक उमेदवाराला घालून देण्यात आलेले आहेत. वन विंडो योजना लागू करण्यात आली असून बॅनर, पोस्टर, आणि सभेची परवानगी यासाठी ही विंडो कार्यरत असेल. टीव्हीवर किंवा प्रसारमाध्यमात जाहिरात देण्यासाठी नियमावली तयार केली असून प्रत्येक उमेदवाराने त्या नियमावलीच्या अधीन राहूनच आपली जाहिरात देणे बंधनकारक असल्याचे देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.