जालना - केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची विशेष मोहीम 8 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख बँकांचे व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना परळीकर म्हणाले की, अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र, आजवर कुठल्याही वित्त संस्था किंवा बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला नाही. त्यांच्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी मदत होईल. ज्या शेतकऱ्यांनी या कार्डचा लाभ घेतलेला आहे. त्यांना आवश्यकतेनुसार व्यवसाय व पशुसंवर्धनासाठी वाढीव कर्जमर्यादा मिळू शकेल, त्यासंदर्भात त्यांनी त्यांच्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री. परळीकर यांनी केले. तीन लाखा पर्यंतच्या पत मर्यादेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाच्या कागदपत्रांसाठी व निरीक्षण खर्चासाठी सवलत देण्यात आलेली आहे. अर्ज केल्यानंतर 15 दिवसांनी त्यांना कर्ज पुरवठा करावा अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले.