जालना - ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी, म्हणून शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केलेले आहेत. तर मोठ्या गावात उपकेंद्र सुरू केलेले आहे. मात्र उपकेंद्रांना इमारती नसल्यामुळे आरोग्य कर्मचारी मनात येईल तेव्हा येतात व रस्त्यावर किंवा कोणाच्या घरासमोर थांबून निघून जातात. इमारतीअभावी होणारी अडचण लक्षात घेता बदनापूर तालुक्यातील कडेगाव ग्रामपंचायतने जिल्हा परिषद प्रशासनांकडे पाठपुरावा करून इमारतीचे बांधकामासाठी प्रयत्न केले होते.
ग्रामपंचायतचा सतत पाठपुरावा आणि आमदार नारायण कुचे यांच्या पाठपुराव्याने शासनाने कडेगाव प्राथामिक आरोग्य उपकेंद्र इमारतीसाठी ४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असता चार वर्षांपूर्वी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. कडेगाव येथे ४० लक्ष रुपये खर्च करून प्रतिक आरोग्य उपकेंद्राचे इमारत बांधण्यात आली. मात्र या इमारतीचा उपयोग आजपावेतो आरोग्यसेवेसाठी झालेला नाही. त्यामुळे आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती बनली आहे.
शासन कोरोनाच्या महासंकटामध्ये शासन एकीकडे नवीन दवाखाने हॉस्पिटल उभारण्याची तयारी करतंय आणि दुसरीकडे कडेगाव येथे चार वर्षांपासून आरोग्य उपकेंद्र उभा राहिलेलं असतानादेखील त्या इमारतीचा वापर होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इमारतीचा वापर होत नसल्याने खिडक्यांच्या काचादेखील फुटल्या आहेत. तर दरवाजे-गेटदेखील बेपत्ता झाले, अशी बिकट अवस्था कडेगाव येथील आरोग्य केंद्राची झालेली आहे.
खऱ्या अर्थाने आज जगावर ऐवढं मोठं संकट यामध्ये देशात आणि राज्यात प्रशासन दिवस-रात्र एक करून जनतेच्या सुरक्षेसाठी वेगवेगळी उपकरणे वेगवेगळे दवाखाने, शासकीय दवाखाने, प्रायव्हेट दवाखाने, शाळा कॉलेजेस यांच्यामध्येही ही पेशंट शिफ्ट करण्याची तयारी करतंय. दुसरीकडे कडेगावसारख्या इमारती उभा असूनदेखील त्याचा उपयोग घेतल्या जात. हे कोणाचं अपयश म्हणावं लागेल का, अशा प्रश्न उपस्थित होत असून या कोरोना महामारीमध्ये कडेगावसारखं आरोग्य केंद्र सुरू करण्याची अत्यंत गरज आहे.
गणेश कोल्हे - माजी उपसरपंच कडेगाव
कोरोना व्हायरसमुळे ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी व गावकरी यांना छोटे-मोठे दुखणे घेऊन शहरातील हॉस्पिटलमध्ये जाण्याची भीती निर्माण झाली. त्यांच्यासाठी हे हॉस्पिटल सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व आरोग्य मंत्री यांनी आशा ठिकाणी लक्ष देणे आवश्यक आहे. आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री यांना नम्र विनंती आहे, की हा विषय गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर या आरोग्य सेवा केंद्राची सेवा सुरू करण्यात यावी.
विठ्ठल हरकळ -गटविकास अधिकारी पंचायत समिती बदनापूर
बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम चार वर्षांपूर्वी झालेले असून उद्घाटन झालेले नाही. ग्रामस्थांनी निवेदन दिले असून त्यादृष्टीने जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्यांना योग्य त्या कारवाईस्तव पाठविण्यात येत आहे. शासनाचे आदेश प्राप्त होताच प्राथमिक आरोग्य उपकेंदाच्या इमारतीचे उद्घाटन करून जनतेच्या सेवेत सुरू करण्यात येईल.