जालना - एखाद्या शिस्तप्रीय अधिकाऱ्याचा दरारा काय असतो, याचा प्रत्यय बुधवारी आणि गुरुवारीजालना तहसीलमध्ये पहावयास मिळाला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर जालना जिल्ह्यात हजेरी लावणार असल्याची सूचना आली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाटेवर असलेल्या तहसीलमध्ये स्वच्छतेची कामे सुरू झाली.
तहसीलमध्ये कानाकोपऱ्यात बसलेले दलाल आणि कामानिमित्त तहसीलमध्ये आलेल्या नागरिकांनी अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने, असे चित्र येथे नेहमी दिसते. पर्यायाने तहसील म्हणजे 'आओ जाओ घर तुम्हारा' अशी परिस्थिती आहे. परंतु औरंगाबादचे विभागीय आयुक्त म्हणून सुनील केंद्रेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बुधवार दि. २० रोजी पहिल्यांदाच जालना जिल्ह्यात हजेरी लावणार असल्याची सूचना आली होती. त्यामुळे लगेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाटेवर असलेल्या तहसीलमध्ये स्वच्छतेची कामे सुरू झाली.
मुख्य प्रवेशद्वारासमोरील वाहने सुरळीतपणे बाजूला लावून परिसर स्वच्छ केला. एवढेच नव्हे तर आपला टेबल सोडून दुसऱ्याच्या टेबलवर जाऊन किंवा अर्ध्या-अर्ध्या तासाला चहाचे बहाने करून गायब होणारे कर्मचारीही काल खुर्चीला चिटकून होते. याउलट गुरुवारी तहसीलमध्ये सर्व काही पूर्ववत सुरू झाले. मुख्य कार्यालयासमोर दलाल, वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणामुळे गरजू व्यक्ती त्रस्त झाला आहे. एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकार्यामुळे शासकीय व्यवस्थापनावर काय परिणाम होऊ शकतो, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.