जालना- दरवर्षी डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाईचे प्रमाण यावर्षी कमी झाले आहे. आता पारंपारिक वाद्य म्हणून ओळख असलेल्या संबळ या वाद्याचा उपयोग केल जात आहे. एक नव्हे दोन नव्हे, तर ढोल-ताशाच्या पथकाप्रमाणे संबळ वाजविणारे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी एकत्र येत आहेत.
जालना शहरात यावर्षी गणेशोत्सवादरम्यान दोन मोठे बदल पाहायला मिळाले. त्यामध्ये पहिला बदल म्हणजे या वर्षीच्या गणेश मूर्ती प्रचंड मोठ्या होत्या. आणि देखावे देखील मोठ्याप्रमाणात केले होते. त्यामुळे दर वर्षीच्या तुलनेत गणपती पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत २०% गर्दी वाढली होती. आणि दुसरा मोठे बदल म्हणजे डीजे बरोबरच संबळ या पारंपरिक वाद्याचा वापर.
हेही वाचा- जालना : जि.प. मध्ये निवडणुकीच्या तोंडावर ४४ कोटींच्या निविदा रद्द; लोकप्रतिनिधींमध्ये अस्वस्थता
दरम्यान, लाडक्या गणपती बाप्पाची मन भरून सेवा केल्या नंतर अता त्यांना उत्साहात निरोप देण्याची वेळी आली आहे. त्याअनुषंगाने नव्या जालन्यातील मोठाले गणपती रात्री उशिरा विसर्जित होणार आहेत. तत्पूर्वी 'नवयुवक गणेश मंडळ' हा मानाचा गणपती, मामा चौकातून सर्वात प्रथम पुढे निघणार आहे. या गणपतीच्या विसर्जनापूर्वी जुन्या आणि नवीन जालन्यातील काही गणेश मंडळांनी सकाळी अकरा वाजल्यापासूनच मिरवणुकीला सुरुवात केली होती.
दरम्यान, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोतीबाग परिसरात घरगुती गणेश मंडळांचे मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले. नगर परिषदेच्या वतीने या परिसरात तीन कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. यामध्ये गणेशमूर्ती विसर्जित करून परत वर काढून ठेवण्यात आल्या आहेत. नंतर या मूर्तींचे शहराच्या बाजूला असलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये विसर्जन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर नगरपालिका, सामाजिक वनीकरण विभाग, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, या विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही इथे निर्माल्य गोळा करण्याचे काम केले. यावेळी मोती बाग परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषाने दणाणून गेला होता.