जालना - शहरातील पाणीप्रश्नाने चांगलाच पेट घेतला आहे आज सायंकाळी जुना जालना भागातील महिलांनी रास्तारोको करून हातात दगड घेतले. एवढेच नव्हे तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळही करण्यात आली.
जुना जालना भागातील प्रभाग क्रमांक 24 मधील बरवार गल्ली, बाजार लाईन, बागवान गल्ली, अशोक नगर आणि साळी गल्लीच्या काही भागाला 22 दिवसांपासून पाणी नाही. त्यामुळे संतप्त झालेले नागरिकानी सायंकाळी पाचच्या सुमारास जुन्या जालन्यातील सरस्वती भुवन शाळेजवळच्या चौकामध्ये जमा होऊन रास्तारोको केला. संतप्त झालेल्या नागरिकांनी दोन तास रास्ता रोको करून आपला संताप व्यक्त केला. या रास्ता रोको दरम्यान वाहन घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांनी बळजबरी केल्यास त्यांच्यावर दगडफेक करण्यासाठी महिलांनी तयारी केलेली होती. अशा संतप्त जमावाला समजावून सांगण्यासाठी आलेल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील जमावाने सौम्य शब्दात शिवीगाळ केली. या प्रभागाचे नगरसेवक अमीर पाशा यांना नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी अठरा तारखेला पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा रास्ता रोको आजच्या दिवसांपुरता मागे घेत असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.